कानपूर - उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर राज्यातील 14 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने मोठी हानी झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू झाला असून 234 घरांची पडझड झाली आहे. माणसांसह पशू-पक्ष्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे 16 प्राणी व पक्षी मृत्यू पावले आहेत. कानपूरमध्ये पोलिसांची गाडी पाण्यात अडकली होती, त्यावेळी क्रेनच्या सहाय्याने पोलिसांचा जीव वाचविण्यात आला.
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे तेथील नद्यांना पूर आला असून पुराचे पाणी शहरात शिरले आहे. तर अनेकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. लखनौ येथे आज सकाळीच एक जुनी इमारत कोसळून 8 वर्षीय चिमुकला जखमी झाला आहे. तर कानपूर शहरात जिकडे तिकडे पाणीच-पाणी अशी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी झालेल्या जोराच्या पावसात कानपूर पोलिसांची गाडी अडकून पडली होती. कंबरेएवढे पाणी झाल्याने गाडी चक्क अर्धी पाण्यात बुडाली होती. त्यामुळे पोलिसांनी गाडीच्या टपावर बसून स्वत:ची जीव वाचवावा लागला. याबाबत जवळील पोलीस ठाण्याला माहित देण्यात आली. त्यानंतर, क्रेनच्या सहाय्याने पोलिसांची गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली. त्यावेळी पोलीस चक्क गाडीच्या टपावर बसल्याचे दिसून आले. पावसापुढे प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याचे यावेळी दिसून आले.
पाहा व्हिडिओ -