Jammu Kashmir Terrorist Attack:जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावात दहशतवादी हल्ला झाला आहे. सुट्टी घेऊन घरी आलेल्या लष्करातील जवानावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. देल्हीर मुश्ताक, असे जखमी जवानाचे नाव असून, या घटनेत त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेनंतर गंभीर जखमी जवानाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात ही घटना घडली आहे. जखमी जवान हा सोफीगुंड खानगुंड येथील रहिवासी आहे. हा जवान उत्तर काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होता आणि सुट्टी घेऊन आपल्या गावी आला होता. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
सुरक्षा दल प्रत्येक गावात शोध मोहीम राबवत आहेत. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी अशा प्रकारे हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दहशतवाद्यांनी अशा प्रकारची भ्याड कृत्ये केली आहेत. आजच(दि.4) सकाळी पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या चौकीवर दोन ग्रेनेड फेकल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.