अजमेर - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे, असे म्हणत काँग्रेसने देशभरात 'शहिदों को सलाम दिवस पाळला' आहे. देशातील विविध राज्यांत आणि जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, राजस्थानमध्ये याच श्रद्धांजली कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले.
चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केल्याचे काँग्रेसने यापूर्वी म्हटले होते. लडाख सीमारेषेवरील तणावाचा आणि केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी काँग्रेसकडून २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला.
देशभरात काँग्रेसने शहीज जवानांना आंदरांजली वाहिली, विशेष म्हणजे कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजस्थानमध्ये या श्रद्धांजली कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे दिसून आले. अजमेर येथेही शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरु होता. मात्र, त्याचवेळी दोन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. तोंडाला मास्क लावून उपस्थित असलेल्या दोन युवकांमध्ये ही मारहाण झाली असून उपस्थितांनी वेळीच सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यत सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. दरम्यान, याच दिवशी #SpeakupForOurMartyrs ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर पाहायला मिळाली. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर राहुल गांधींनी मोदींना प्रश्न केला आहे.
संबंधित बातम्या
'मोदीजी घाबरू नका, चीननं जमिन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा'