उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्याच्या आतमध्ये अडकलेल्या ४१ मजुरांपर्यंत पोहचण्यास तब्बल १७ दिवसांनी यश आले आहे. अथक प्रयत्न, जगविख्यात कंपन्यांच्या मशीन आणूनही त्या अपयशी ठरल्या होत्या. परंतू, ज्या रॅट होल मायनिंग टेक्निकला एनजीटीने बॅन केलेले तीच टेक्निक आज यशस्वी ठरली आहे. भारतीय सैन्याच्या रॅट मायनर्सनी कमाल करत मातीच्या ढिगाऱ्याला छेदले आहे.
अमेरिकेच्या ऑगर मशीननेही काम सोपे केले होते. या मशीनने 48 मीटर पर्यंत दगड, मातीचा ढिगारा भेदला होता. परंतू, ती बंद पडली होती. अखेर शेवटचा पर्याय म्हणून रॅट मायनर्सना बोलविण्यात आले होते. या रॅट मायनर्सनी सोमवारी ४-५ मीटरची खोदाई करून माती बाहेर काढली होती. तोवर ५२ मीटर पाईप टाकण्यात आले होते. म्हणजेच आतमध्ये अडकलेले मजूर आणि रेस्क्यू टीमचे अंतर केवळ ३ मीटर एवढे राहिले होते.
दुसरा डोंगरावर व्हर्टिकल ड्रील करण्याचे कामही सुरु करण्यात आले होते. एकूण ८६ मीटर व्हर्टिकल ड्रील केले जाणार होते. आज दुपारपर्यंत ४२ मीटर ड्रील करण्यात आले होते. आतमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनला कापून बाहेर काढण्यात आले. यानंतर रॅट मायनर्सचे काम सुरु झाले होते.
सिलक्यारामध्ये मशीनचे भाग तुटत होते किंवा बोगद्याच्या आत अडकले होते. पावसाचीही भीती होती. एकदा का बोगदा पाण्याने भरू लागला की परतीचा मार्ग सोपा नसतो. आत अडकलेल्या कामगारांना डोकेदुखी आणि उलट्या झाल्याची तक्रारी आल्या होत्या. हे कमी ऑक्सिजनचे लक्षण आहे. त्यामुळेच रॅट मायनिंगचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे काम 3 टप्प्यात केले जात होते. एक माणूस खणायचा, दुसरा ती माती गोळा करायचा आणि तिसरा बाहेर काढायचा. अत्यंत कष्टाच्या आणि जोखमीच्या या कामात धोका कमी करण्यासाठी अनेक व्यवस्था करण्यात आल्या होत्या. या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजनसाठी ब्लोअर बसविण्यात आले होते. अखेर ही टेक्निक यशस्वी ठरली.