नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयाचा मोठा हलगर्जीपणा आता समोर आला आहे. दिल्लीत एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्याने रस्त्यावरच या महिलेची प्रसूती करावी लागल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या दादरी येथून एक 30 वर्षीय माहिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आली होती. महिलेला रात्रीपासून प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या ती वेदनेने विव्हळत असल्याने तिला तातडीने सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महिलेला वेदना सुरू झाल्या नसल्याचं सांगत रुग्णालयाने तिला प्रसूती कक्षात दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. महिलेला खूप त्रास होतोय, असं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी रुग्णालयावर जोरदार टीका केली आहे. व्हायरल या व्हिडिओत काही महिला गर्भवती महिलेभोवती साडी घेऊन उभ्या आहेत. तर आजूबाजूला नर्सेसही दिसत आहेत.
गर्भवती महिलेला रस्त्यावरच मुलाला जन्म द्यावा लागला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने सफदरजंग रुग्णालयाकडून रिपोर्ट मागितला आहे. तर, दिल्ली महिला आयोगानेही रुग्णालयाला नोटीस धाडली असून रुग्णालय प्रशासनाला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.