नवी दिल्ली – दक्षिण दिल्लीच्या शहापूर जाट परिसरात काही लोकांनी मंदिरातीलसाईबाबाची मूर्ती तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला झाला, गेल्या आठवड्यात ही घटना घडली, याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यापासून अनेक साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली, त्यानंतर आज या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साऊथ झोनचे डीसीपी अतुल कुमार म्हणाले की, शहरातील काही साईबाबा भक्तांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, साईबाबांची मूर्ती अशाप्रकारे तोडल्याने भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. २५ मार्च रोजी शहापूर जाट परिसरातील जुन्या शिवमंदिरात असलेली साईबाबांची मूर्ती तोडण्यात आली. त्यांच्याजागी गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर कमिटीने ही मूर्ती जुनी झाल्याने हटवण्यात आल्याचं म्हटलं, परंतु या व्हिडीओ स्पष्टपणे साईबाबांवर भाष्य करताना हा देव नाही, १९१८ मध्ये याचा मृत्यू झाला होता, तो मुस्लीम होता अशा शब्दात बोलताना ऐकायला मिळत आहे. सध्या पोलीस या व्हिडीओच्या माध्यमातून तपास करत आहेत, याबाबत मंदिर कमिटी सदस्य पदम पनवार यांनी दावा केला की, साईबाबांची मूर्ती जुनी झाल्याने हटवण्यात आली, एखादी मूर्ती जुनी झाल्यास ती हटवली जाते, मंदिराचं पुनर्निमाण करण्यात येणार आहे, त्यानंतर बैठक घेऊन साईबाबाची नवीन मूर्ती परत बसवायची की नाही हे ठरवलं जाईल असं ते म्हणाले. तसेच मी या व्हिडीओवर काही बोलू शकत नाही, जर कोणता व्हिडीओ असेल तर तो फेक आहे असंही त्यांनी सांगितले.
तर कमिटीचे दुसरे सदस्य भारत पनवार म्हणाले की, ही साईबाबांची मूर्ती २००९ मध्ये बसवण्यात आली होती, आता साईबाबांची मूर्ती हटवून त्याठिकाणी गणपतीची मूर्ती लावण्यात येणार आहे, रहिवाशांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेण्यात आला, कोणत्याही स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली नाही असं त्यांनी सांगितले. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ही मूर्ती हातोड्याने हटवली जात असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती साईबाबा कोणताही देव नाही, १९१८ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता, तो मुसलमान होता, जर मूर्ती लावायची असेल तर भगत सिंग, सुखदेव यांची मूर्ती लावा असं तो म्हणत आहे.