उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी अजब विधान केलं आहे. गोठ्यात झोपल्याने आणि गोठ्याची स्वच्छता केल्याने कॅन्सर बरा होऊ शकतो, असं गंगवार यांनी म्हटलं आहे. तसेच गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होऊ शकतो, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
रविवारी संजय सिंह गंगवार यांच्या हस्ते नौगावा पकडिया येथे ५५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कान्हा गोशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. गायीची प्रत्येक गोष्ट कुठेना कुठे तरी उपयोगी पडत असते असंही त्यांनी एका जाहीर सभेत बोलताना सांगितलं.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गंगवार म्हणाले, "जर कोणी ब्लड प्रेशरचा रुग्ण असेल, तर येथे गायी आहेत. त्यांनी सकाळ-संध्याकाळ गायीच्या पाठीवरून हात फिरवायला हवा आणि त्यांची सेवा करायला हवी. जर व्यक्ती औषधाचा २० मिलीग्राम डोस घेत असेल तर १० दिवसांत १० मिलीग्रामने ते कमी होईल."
"जर कॅन्सरच्या रुग्णाने गोठ्याची साफसफाई केली आणि त्याने गोठ्यात झोपायला सुरुवात केली तर कॅन्सरही बरा होतो. शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या जाळल्यास डासांचा त्रास कमी होतो, दिलासा मिळतो. गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही प्रकारे उपयोग होत असतो."
आपल्या शेतात जनावरं चरत असल्याच्या तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यमंत्र्यांनी खडसावलं. ते म्हणाले, आपण आपल्या आईची सेवा करत नाही, त्यामुळे आई कुठेतरी आपलं नुकसान करत आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या दिवशी गोशाळेत येण्याचं आवाहन करून त्यांनी सांगितलं की, ईदला तयार होणारा शेवया गायीच्या दुधापासूनच बनवाव्यात.
रविवारी उद्घाटन झालेल्या या गोशाळेत गायींसाठी चारा आणि औषधाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना गोशाळेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच लोकांनी आपल्या लग्नाचे वाढदिवस, त्यांच्या मुलांचे वाढदिवस गायींसोबत साजरे करण्याची आणि गोशाळांना चारा दान करण्याची विनंती मंत्र्यांनी केली आहे.