नवी दिल्ली - अमरावती मतदारसंघातील खासदार नवनीत राणा कौर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेतील आपल्या भाषणावेळी नवनीत कौर यांनी शिवसेनवर जहरी टीका केली. शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांसाठी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. पण, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या लालचेसाठी, आपल्या पोस्टसाठी शिवसेना महाराष्ट्रात सरकार स्थापन करत नाही. जनतेनं मताधिक्य दिल्यानंतरही शिवसेना युतीतून बाहेर का पडली, असे म्हणत राणा यांनी शिवसेनेवर जबरी प्रहार केला.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास फक्त शिवसेनाच जबाबदार आहे. स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च घर भरण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेनं सत्ता स्थापन करायला हवी होती. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांना मदत करायची भावना असल्यास मी स्वत:च घरही जाळायला तयार आहे. पण, शिवसेना सत्ता स्थापनेपासून दूर केली. मी जिल्ह्यातील तालुक्यात फिरुन, फिरुन पाहिलंय. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मुग आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. पण, आज आमच्या राज्याला माय-बाप कुणीच नाही. त्यामुळे, केंद्र सरकारच आमचं मायबाप असून केंद्राने आम्हाला 50 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत राणा कौर यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ -
नवनीत कौर यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर सभागृहात त्यांना विरोध करण्यात आला होता. मात्र, मी आज थांबणार नाही, आज कुणीही माझा आवाज बंद करू शकणार नाही. मी माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं गाऱ्हाण सांगणारचं, असे म्हणत कौर यांनी लोकसभेत आक्रमकपणे भूमिका मांडली.