हैदराबादच्या गोशामहल परिसरात शुक्रवारी रस्ता खचल्याने मोठा अपघात झाला. अपघाताच्या वेळी रस्त्यावर बाजारपेठ होती, त्यामुळे बाजारपेठेत गर्दीही होती. अचानक रस्ता खचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र यावेळी अनेक वाहने व हातगाड्या खड्ड्यात गेल्या. माहिती मिळताच पोलीस आणि जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
हा रस्ता नाल्यावर बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर बाजारपेठ होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक भाजी खरेदीसाठी येतात. इथे अनेकजण हात गाड्यावरुन भाजीपाला विकत होते. रस्ता अचानक खचल्याने हातगाड्यांसह लोकही खड्ड्यात पडले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र भाजी विक्रेत्यांचे निश्चितच नुकसान झाले आहे. या घटनेबाबत नागरिकांमध्ये संतापासह घबराट पसरली आहे.
गोशामहलचे आमदार राजा सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, हा पूल 2009 मध्ये काँग्रेसच्या काळात बांधण्यात आला होता. नाल्यावरील पुलाच्या बांधकामात निकृष्ट लोखंडाचा वापर करण्यात आल्याने हा भ्रष्टाचार आहे, असा आरोप त्यांनी केला.