नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्याने भाजपाच्या माजी आमदाराला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील बडनगर येथे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात प्रशासनाचं काम सुरू होतं. येथील घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर एसडीएम असणाऱ्या निधी सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक येथील रस्त्याच्या बांधकामामध्ये सुधारणा करुन पाणी साचणार नाही यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी पोहोचले.
कामाची तयारी सुरू असतानाच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या निधी सिंह यांच्याबरोबरच भाजपाचे माजी आमदार शांतीलाल धबाई वाद घालू लागले. या कामाला शांतीलाल यांचा विरोध होता. त्यांनी निधी यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी निधी यांनी माजी आमदाराला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही शांतीलाल हे शांत झाले नाहीत. आपल्या समर्थकांसोबत या ठिकाणी पोहचलेल्या शांतीलाल यांनी निधी यांना कामावरुन हटवण्याची धमकी दिली.
शांतीलाल यांनी निधी यांना मी तुला नोकरीवरुन काढून टाकेन, अशी धमकी दिली. त्यावर "माझ्या नोकरीबाबत बोलणारा तू कोण आहेस, हिंमत असेल तर मला नोकरीवरून काढून दाखव, आता निघून जा इथून" असं निधी यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची मोठी चर्चा रंगली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपा नेत्याचा हा व्हिडीओ शेअर करत खिल्ली उडवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.