भोपाळ - देशभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यस सेवांनाच परवनागी देण्यात आली आहे. त्यामुळे, लग्न-समारंभासारख्या कार्यक्रमांनाही अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. येथील रतलाम शहरातील मंगलकार्यालयात एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा विवाह पार पडला. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत हा शुभमंगल सावधान... सोहळा संपन्न झाला.
कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर लग्न केल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण असावे. येथील एका तरुणाचे एका तरुणीसोबत 26 एप्रिल 2021 रोजी लग्न होणार असल्याचे एक वर्षांपूर्वीच निश्चित झाले होते. मात्र, दुर्दैवाने लग्नाच्या काही दिवस अगोदरच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यातच, 19 एप्रिल रोजी नवरदेव पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे, लग्न करावे की नाही याबाबत विचारविनिमय झाला. अखेर, पीपीई कीट परिधान करुन लग्न करण्याचा निर्णय झाला.
पोलीस आणि तालुका प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक आणि तहसिलदार यांनी मंगलकार्यालयाच्या ठिकाणी धाव घेतली. चर्चेअंती लग्नास परवानगी देण्यात आली. त्यानंतर, हा पीपीई कीट परिधान करुन झालेला लग्नसोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला लग्नासाठी परवानगी देण्यात येत नाही. पण, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काही अटी व शर्थींनुसार हे लग्न पार पडले आहे. यापुढील कारवाई निश्चि होईल, असे रतलामचे तहसिलदार नवीन गर्ग यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.