पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण बसंती बेन उत्तराखंडमधील ऋषिकेशजवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी देवी यांच्या दुकानात पोहोचली तेव्हा ती एक खास भेट होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची बहीण ऋषिकेशला पोहोचली होती. गुजरातवरून आलेले हे पाहुणे दयानंद आश्रमात थांबले होते अशी माहिती समोर आली आहे.
पती हंसमुख आणि काही नातेवाईकांसोबत बसंती बेन यांनी सुमारे 2 किमी पायी चालल्यानंतर पौरी गढवालमधील कोठार गावाजवळील प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिराला भेट दिली. परत येताना त्या शशी देवींच्या दुकानात पोहोचल्या. या दोघींच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये दोघीही एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत.
देशातील दोन शक्तिशाली आणि लोकप्रिय नेत्यांच्या बहिणींनी एकत्र काही वेळ घालवला. पंतप्रधान मोदींच्या बहिणीने शशी देवी यांच्या विनम्र जीवनशैलीचे कौतुक केले. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नातेवाईक सहसा प्रसिद्धीपासून दूर राहतात. शशी देवी कोठार गावात राहतात आणि 'माँ भुवनेश्वरी प्रसाद भंडार' नावाचे दुकान चालवतात, पूजेसाठी वापरल्या जाणार्या इतर वस्तू विकतात अशी माहिती आहे.
शशी देवीचे पती 'जय श्री गुरु गोरक्षनाथ जी' नावाने चहाचे छोटेसे दुकान चालवतात. योगायोगाने आदित्यनाथ हे गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे महंत आहेत. मुख्यमंत्री हे उत्तराखंडचे असून त्यांची आई आणि भाऊ पौरी जिल्ह्यातील पंचूर गावात राहतात. मागच्या वर्षी आदित्यनाथ आपल्या आईला भेटायला गेले होते आणि नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आईला भेटल्याबद्दल बोलले आणि बहिणीबद्दलही बोलले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.