उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये प्रवाशांनी भरलेली ई-रिक्षा पलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणलाही गंभीर दुखापत झालेली नाही. रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आणि खड्ड्यांमुळे ही घटना घडली आहे. VIP ताफ्याला जागा देताना ई-रिक्षा उलटली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात हे दररोज होत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून एक व्हिआयपी ताफा जात होता. गाडीमधून अनेक मोठे अधिकारी प्रवास करत होते. त्याचवेळी ताफ्यासमोर एक ई-रिक्षा आली. रिक्षाचालकाने ताफ्याला जागा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात खड्ड्यांमुळे ई-रिक्षा पलटली. रिक्षा पलटल्यानंतरही ताफ्यातील वाहनं पुढे जात होती. ताफ्यातील एकही कार थांबली नाही. ई-रिक्षातील प्रवाशांसाठी कोणताही अधिकारी पुढे आला नाही.
अपघातग्रस्त प्रवाशांना कोणीच मदत केली नाही. शेवटी रस्त्यावर उपस्थित असलेल्यांनी प्रवाशांसाठी धाव घेतली आणि त्यांना मदत केली. रिक्षातून प्रवास करणारी महिला, लहान मुलं आणि इतर जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून रस्त्यावरूल खड्ड्यांवरून प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या मागे एका रिक्षाला खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचं समोर आलं होतं. एक सर्वसामान्य नागरिक खड्ड्यांमुळे होणाऱ्या समस्यांवर बोलत होता. कॅमेऱ्यासमोर तो प्रतिक्रिया देत असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी ई-रिक्षा खड्ड्यांमुळे अचानक उलटली होती.