ओडिशा - नौपाडा जिल्ह्यातील एका महिलेला आपल्या १०० वर्षीय आईला चक्क खाटावरुन बँकेत नेणं भाग पडलं आहे. बँके मॅनेजरच्या आडून बसलल्याने या आजीची पेन्शन मिळविण्यासाठी तिच्या लेकीने रस्त्याने खाट ओढत बँकेपर्यंत नेला. शारिरीक अपंगत्वाचे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय बँकेतून संबंधित महिलेला पेन्शन देण्यात येणार नाही, अशी भूमिका येथील बँक मॅनेजरने घेतली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला खाटासह आपल्या आईला रस्त्यावरुन नेत असल्याचे दिसून येते. नौपाडाच्या बारगांव येथील ६० वर्षीय पूंजीमती या पलंगावर झोपलेल्या आपल्या आईस रस्त्यावरुन ओढत नेताना दिसत आहेत. केंद्र सरकारने एप्रिल आणि जून महिन्यात महिलांच्या जन-धन खात्यात ५०० रुपये जमा केल्याची घोषणा केली. त्यामुळे ९ जून रोजी पूँजीमती या स्थानिक ग्रामीण बँकेत ही जमा झालेली रक्कम काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, बँक मॅनेजर अजित प्रधान यांनी पेन्शन देण्यास नकार दिला. जोपर्यंत खातेदार महिला बँकेत येत नाही, तोपर्यंत बँकेकडून पैसे देण्यात येणार नाहीत, अशी भूमिका प्रधान यांनी घेतली होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, याबाबत जिल्हाधिकारी मधुस्मिता साहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित बँक मॅनेजर पीडित महिलेच्या घरी जाऊन पाहणी करुन पेन्शन देणार होते. मात्र, पूँजीमती यांनी वाट न पाहता, त्यांच्या आईला तशाप्रकारे बँकेत आणले. पहिल्या दिवशी बँकेत मॅनेजर एकटेच असल्याने त्यांना घरी जाणे शक्य झाले नव्हते, असेही जिल्हाधिकारी साहू यांनी सांगितले. दरम्यान, एखादी वृद्ध व्यक्ती घरातून बाहेर पडू शकत नसेल किंवा अपंगत्व असेल तर बँकेने संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पैसे द्यायला हवेत, असा आरबीआयचा नियम आहे.