जम्मू : बालाकोट हवाईहल्ल्यानंतर भारतात घुसलेल्या पाकिस्तानी विमानांच्या ताफ्याला हुसकावून लावण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शौर्य बजावले होते. याबाबत ते देशाचे हिरो ठरले होते. या अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढून घेणे कोणाला आवडणार नाही? सामान्य सोडा जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या तळावर त्याच्या सहकारी जवानांनीही सेल्फीसाठी मोठी गर्दी केली होती. याचा व्हिडीओ सोशम मिडीयावर व्हायरल होत आहे.
भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.
अभिनंदन हे कर्तव्यावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातून त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पश्चिम विभागातील एखाद्या महत्त्वपूर्ण हवाई तळावर नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे. या दरम्यान, त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी जवानांनी एकच गर्दी केली.