छिंदवाडा - सरकारकडून, सामाजिक संस्थांकडून माध्यमांकडून वारंवार सेल्फीसाठी धोका न पत्करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. पर्यटनस्थळी गेल्यानंतर एखाद्या स्पॉटवर हा सेल्फीसाठी धोकादायक पॉईंट असल्याचं आवर्जून सांगण्यात येतं. मात्र, तरीही उतावीळ आणि उत्साही तरुणाई आपला जीव धोक्यात घालून सेल्फीचा हट्ट पूर्ण करतात. यावेळी, अनेकदा जीवावर बेतण्याचे प्रकार घडले आहेत.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पेंच नदीत उतरुन दोन तरुणींनी सेल्फी काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र, सेल्फी काढण्याचा नादात त्यांना पाण्याच्या पातळीचा अंदाजही आला नाही. आपल्या जीव धोक्यात घालून या दोन्ही मुली वाहत्या पाण्याच्या नदीपात्रात उतरल्या. पण, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यांना तेथून बाहेर पडता येईना. त्यानंतर, या नदीपात्रात अडकेल्या या मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, त्यांच्या मित्रांनी पोलिसांनाही कळवले. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि या पथकाच्या मदतीने या मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रुप पिकनीकला परवानगी नसतानाही, आपल्या मित्रांसह या मुली बेलखेडी गावातून पर्यटनाला आल्या होत्या. नदीपात्रातील एका दगडावर सेल्फी घेण्यासाठी त्या नदीत उतरल्या अन् पाण्याचा प्रवाह वाढला. सुदैवाने त्यांचा जीव वाचला.