Hyderabad: तीन दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये भरधाव कारने तिघांना उडवल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा भरधाव BMW कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हैदराबाद पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्चभ्रु बंजारा हिल्स परिसरात ही घटना घडली आहे. एक महिला दारुच्या नशेत बीएमडब्ल्यू कार चालवत होती. या घटनेच्या सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक स्कुटीस्वार अतिशय सावकाश डाव्या बाजूने जात आहे, तेवढ्यात समोरुन भरधाव कार त्याला उडवते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरोपी महिला घटनास्थळावरून फरार झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी व्यक्ती ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) मध्ये काम करतो. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. त्या महिलेचा शोध सुरू आहे.
भरधाव कारने 3 जणांचा घेतला बळी शहरात तीन दिवसांपूर्वी कारने दोन महिला आणि एका बालकालाचा बळी घेतल्याची ही घटना समोर आली आहे. कार एवढी वेगात होती की चालकालाही त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. या घटनेत दोन महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला. तिघे सकाळी फिरायला बाहेर पडले होते. त्या अपघाताचेही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले.