नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक सात वर्षाचा मुलगा झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना दिसत आहे. त्याच्या वडिलांचा अपघात झाल्यानंतर, मुलाने त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी फूड डिलिव्हरीचं काम करायला सुरुवात केली. जो आता झोमॅटोसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. राहुल मित्तल नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला असून तो 43 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चिमुकला कठीण प्रसंगी आपल्या कुटुंबासाठी करत असलेल्या या गोष्टीचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर मुलाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जवळपास 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मित्तल त्या लहान मुलाशी बोलत असल्याचे दिसत आहे. तो हे का करतो असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर हातात चॉकलेट्सचा बॉक्स धरलेला हा मुलगा ट्विटर युजर्सना त्याच्या कामाचं वेळापत्रक समजावून सांगताना दिसत आहे. मुलगा घरोघरी अन्न पोहोचवण्यासाठी सायकलचा वापर करतो.
मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये फूड डिलिव्हरी कंपनीला टॅग केलं आहे. तसेच "हा 7 वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांच्या जागी काम करत आहे कारण त्याच्या वडिलांचा अपघात झाला आहे, मुलगा सकाळी शाळेत जातो आणि 6 नंतर तो zomato मध्ये काम करतो" असं म्हटलं आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, तो सकाळी 6 ते 11 या वेळेत सायकलवर घरोघरी जाऊन जेवण देतो आणि सकाळी शाळेत जातो. ट्विटर युजर्स हे ऐकून भावूक झाले आणि त्यांनी मुलाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एका युजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कृपया DM मध्ये अधिक माहिती शेअर करा, त्याचा अभ्यास आणि खर्चाची काळजी घेऊ." तर दुसऱ्या एकाने "मुलाचे परिश्रम, संयम, त्याचा दृढनिश्चय आणि मदतीचा स्वभाव त्याच्या अभ्यासाशी जोडला गेला तर तो समाजासाठी काय चांगले करू शकेल याची कल्पना करा"असं म्हटलं आहे. तर काहींनी हे कामगार कायद्याचे उल्लंघन आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.