नवी दिल्ली - देशातील ख्यातनाम उद्योजिका, लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती (वय ७३ वर्षे) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याबद्दल मूर्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी अभिनंदन केले होते. इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे त्यांचा समाजात वेगळाच प्रभाव दिसून येतो. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्याकडून आज त्यांना राज्यसभा खासदारीकीची शपथ देण्यात आली. याप्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
सुधा मूर्ती यांनी आज खासदारकीसाठी पद व गोपनियतेची शपथ घेतली. त्यावेळी, त्यांचे पती नारायण मूर्ती आणि मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्यासोबत आपुलकीने संवाद साधला. त्यामुळे, आता लवकरच संसद भवनातील वरच्या सभागृहात सुधा मूर्ती सहभागी होतील. सुधा मूर्ती यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. स्त्रीशक्तीने देशाचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा शब्दात मोदींनी त्यांच्या निवडीचे कौतुकही केले होते. आज, त्यांनी संसदीय शपथ घेतली.
सुधा मूर्तींनाही आश्चर्य वाटले
सुधा मूर्ती यांनी निवडीनंतर म्हटले होते की, राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड होणे व त्याची घोषणा आंतरराष्ट्रीय महिलादिनी होणे हे माझ्यासाठी आश्चर्याचे दोन धक्के आहेत. राज्यसभेवर निवड होईल, असा मी कधी विचारही केला नव्हता.
पहिल्यांदा संसद भवन पाहून अत्यानंद
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती. यावेळी, संसद पाहून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला. खूपच सुंदर... अतिशय सुंदर... वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला खूप वर्षांपासून संसदभवन पाहण्याची इच्छा होती. आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. येथील संसद भवनातील कलाकूसर, संस्कृती आणि इतिहास सर्वकाही अतिशय सुंदर आहे, असे सुधा मूर्ती यांनी म्हटलं होतं. त्यावेळी, खासदार बनून येऊ इच्छिता का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, हात जोडून नम्रपणे सुधा मूर्ती यांनी नकार दिला. तसेच, मी जिथे आहे तिथे आनंदी आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. यावेळी, पत्रकारांसह सर्वांनीच हसून दाद दिली. मात्र, आता त्या खरंच खासदार बनून संसदेच्या सभागृहात जाणार आहेत. त्यामुळे, नम्रपणे नकार देणाऱ्या सुधा मूर्ती यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.