Viral Video : संपत्तीच्या वादातून कुटुंबांमध्ये अनेकदा जीवघेण्या घटना घडताना आपण पाहिल्या असतील. संपत्तीसाठी एखादी व्यक्ती आई वडील, भाऊ बहिण कोणीच पाहात नाही आणि टोकाचं पाऊल उचलतो. असाच काहीसा प्रकार तमिळनाडूमध्ये समोर आलाय ज्यामुळे मुलाने संपत्तीसाठी वडिलांना ठोसे मारुन मारुन जखमी केलं. मारहाणीनंतर वडिलांचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मुलाला या प्रकरणी अटक करण्यात आली असली तरी वडिलांना या घटनेत जीव गमवावा लागलाय.
कौटुंबिक मालमत्तेची विभागणी केल्यामुळे नाराज झालेल्या मुलाने तामिळनाडूच्या पेरांबलूरमध्ये एका 65 वर्षीय वडिलांना बेदम मारहाण केली. व्यावसायिक कुलंधैवेलू यांना त्यांचा मुलगा संतोष याने केलेल्या मारहाणीनंतर दोन दिवसांनंतर मृत्यू झाला. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर वारंवार बुक्के मारताना दिसत आहेत. वडील रक्तबंबाळ होऊन खाली कोसळत नाहीत तोपर्यंत संतोष त्यांना मारहाण करत होता. यानंतर मुलगा संतोष याला पोलिसांनी अटक केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की,कुलंधैवेलू हे सोफ्यावर बसलेले आहेत आणि अचानक त्यांचा मुलगा येतो आणि काहीही न बोलता त्यांना मारहाण करतो. तो इतक्या वेगाने मारतो की अवघ्या 15 सेकंदात 20 ते 25 तो बुक्के मारतो. यानंतर हात दुखायला लागल्यानंतर तो वडिलांच्या तोंडावर आणि पोटात लाथ मारतो. एवढ्यावरही त्याचे समाधान होत नाही म्हणून तो काही सेकंद थांबतो आणि पुन्हा मारण्यासाठी पुढे सरकतो. पण तेवढ्यात दुसरा कोणीतरी येऊन त्याला पकडतो आणि तिथून घेऊन जातो. त्यानंतर कुलंधैवेलू यांच्याजवळ कोणीही येत नाही.
दरम्यान, कुलंधैवेलू यांच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. कुलंधैवेलू यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर या हल्ल्याबाबत यापूर्वी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पण नंतर तो मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आता कुलंधैवेलू यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी संतोषला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मारहाणीमुळे कुलंथाइवेलू यांना गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय उपचार करूनही वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुलंधैवेलू यांचा मृत्यू १८ एप्रिलला झाला होता. आतापर्यंत, आम्ही के. संतोषबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही त्याला अटक केली. हल्ला आणि त्यांचा मृत्यू यांच्यातील संभाव्य संबंधाचा आम्ही तपास करत आहोत. प्राथमिक निष्कर्षानुसार हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला."