नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी रस्त्यावर पेन विकणाऱ्या लहान मुलीला महागडा आयफोन भेट दिला आहे. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शनिवारी तेज प्रताप यादव पाटणामधील बोरिंग रोडवर एका कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची नजर बाजारामध्ये पेन विकणाऱ्या एका चिमुकलीवर पडली. मेधा नावाची ही मुलगी आपल्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी पेन विक्री करत होती. तेज प्रताप यांनी या मुलीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली तेव्हा तिचे वडील रिक्षाचालक असल्याचं समोर आलं.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मेधा शाळेत जात नसल्याची माहिती देखील तेज प्रताप यांना मिळाली. तेज प्रताप यांनी या मुलीला मदत करता यावी यासाठी आपला मोबाईल नंबर देऊ केला त्यावेळी या मुलीने आपल्याकडे मोबाईल नसल्याचं सांगितलं. या मुलीकडे मोबाईल नसल्याचं आणि तिची परिस्थिती पाहून तेज प्रताप यांना भरुन आलं. त्यांनी लगेच शेजारच्या एका दुकानामधून जाऊन त्या गरीब मुलीला आयफोन खरेदी करुन दिला. त्यानंतर त्यांनी या मुलीला मन लावून अभ्यास कर आणि मोठी हो असंही सांगितलं. मात्र हे सारं घडत असताना आपल्याला आयफोन भेट देणारी व्यक्ती कोण आहे हे मेधाला खरंच माहीत नव्हतं.
पेन खरेदी करुन तिला पेनांचे पैसेही देतात
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तेज प्रताप हे या मुलीला फोन भेट देताना दिसत आहेत. तसेच नंतर तिच्याकडून पेन खरेदी करुन तिला पेनांचे पैसेही देतात. त्यानंतर आता या पुढे हे पेन विक्रीचं काम न करता या पेनाच्या मदतीने शिकून खूप मोठी हो असं तेज प्रताप या मुलीला सांगतात.
व्हिडीओच्या निमित्ताने तेज प्रताप पुन्हा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे मुलांना मदत केली आहे. 2018 साली त्यांनी आपला वाढदिवस गरीब मुलांसोबत साजरा केला होता. त्यांनी या मुलांसोबत केक कापला होता. तसेच त्यांनी या मुलांना भेटवस्तूही दिल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.