तेलंगणामध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. येथील कर्मचारी हेल्मेट घालून दररोजचं काम करताना दिसतात. यामागचं एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. एमपीडीओ कार्यालयाच्या छताची दुरवस्था आणि या धोकादायक स्थितीमुळे कामाच्या वेळी अपघात होऊ नये म्हणून कर्मचारी हेल्मेट घालत असल्याचं आता समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील बीरपूर मंडलमध्ये अजब प्रकार पाहायला मिळत आहे. तेथील कर्मचारी हेल्मेट घालून दैनंदिन काम करताना दिसले. एमपीडीओ कार्यालयाच्या छताची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांवर काम करताना हेल्मेट घालण्याची वेळ आली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कर्मचार्यांनी सांगितले की, छतावरून प्लास्टर पडत असल्याने त्यांनी आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कमी करण्यासाठी त्यांनी हेल्मेट घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या दुरवस्थेची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
या प्रकरणाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये इमारतीची जीर्ण अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्मचार्यांना काम करण्यासाठी सुरक्षित जागा न दिल्याबद्दल नेटिझन्स अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.