तेलंगणामध्ये शुक्रवारी एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये राज्याचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली हे सार्वजनिक कार्यक्रमात वेळेवर फुलांचा गुच्छ न मिळाल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांना कानशिलात लगावताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, अली हे एका अधिकृत कार्यक्रमात आपले कॅबिनेट सहकारी टी श्रीनिवास यादव यांना मिठी मारताना, सुरक्षा रक्षकाकडे वळतात आणि नंतर त्याला थप्पड मारताना दिसत आहेत.
श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या अली यांनी सुरक्षा रक्षकाने वेळेवर पुष्पगुच्छ न दिल्याने संताप व्यक्त केला. श्रीनिवास यादव यांना पुष्पगुच्छ देण्यात येणार होता, पण त्यासाठी थोडा उशीर झाला. याच दरम्यान भाजपाने मंत्र्यांच्या 'अस्वीकारार्ह' वर्तनाचा निषेध केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ट्विटरवर याबाबत ट्विट केलं आहे. "तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. नेतृत्व आदर आणि प्रतिष्ठेवर आधारित असावं. हे वर्तन अस्वीकार्य आहे आणि एक वाईट उदाहरण सेट करतं" असं म्हटलं आहे. तसेच महमूद अली यांच्या प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.