नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील रोशनारा रोडवर असलेल्या कारखान्यात आज भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक अख्खी इमारत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अचानक इमारत कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण गोंधळले. यावेळी अग्निशमन दलाचे सुमारे 100 जवान थोडक्यात बचावले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
इमारत कोसळल्यानंतर धुळीचे लोट परिसरात पसरले. यावेळी समोरील इमारतीवरुन एका व्यक्तीने ही घटना मोबाईलमध्ये शूट केली. स्थानिकांनी सांगिल्यानुसार, ही इमारत खूप जुनी होती आणि यात जयपूर गोल्डन ट्रान्सपोर्टचे गोदाम होते. या इमारतीत मोठ्या प्रमाणात केमिकल ठेवण्यात आले होते. इमारत कोसळल्याने इतर घरांना भेगा पडल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.