Srinagar Formula 4 Race Video: गेल्या काही वर्षांमध्ये कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यातील परिस्थिती बदलली आहे. राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यासोबतच पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काश्मीरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 कार रेसिंगचे आयोजन करण्यात आले. येथील बुलेवर्ड रोडवर या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या फॉर्म्युला-4 कार रेसिंगमध्ये प्रसिद्ध फॉर्म्युला चालकांनी सहभाग नोंदवला. काश्मीरमधील अॅडव्हेंचर टूरिझमला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुलेवर्ड रोडवर हा थरारक शो पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दल सरोवराजवळ 1.7 किमीच्या रस्त्यावर ही अनोखी रेस आणि विविध थरारक स्टंट्सही पाहायला मिळाले. काश्मीरच्या पर्यटन विभागाने फॉर्म्युला-4 आणि इंडियन रेसिंग लीगच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या कार्यक्रमाची पोस्ट शेअर केली. ते म्हणाले, हे पाहून खूप आनंद होतोय. यामुळे जम्मू-काश्मीरचे सौंदर्य आणखी लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल. मोटारस्पोर्ट्सच्या भरभराटीसाठी भारत उत्तम संधी देतो आणि श्रीनगर हे यासाठी अगदी योग्य ठिकाणी आहे.
काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी श्रीनगरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करणे, ही एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले. काश्मीर पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि खोऱ्यातील तरुणांमध्ये मोटर स्पोर्ट्सची आवड निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. गेल्या अनेक दशकांपासून संघर्षाने ग्रासलेल्या राज्यात फॉर्म्युला 4 आशेचा किरण म्हणून काम करेल.