पिलीभीत - उत्तर प्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यातील वाघाच्या एन्ट्रीने अनेकांची झोड उडाली. या वाघाने जंगलातून थेट लोकवस्तीत प्रवेश केल्यामुळे स्थानिकांची चांगलीच भांबेरी उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्येय, येथील गुरुद्वाराच्या भिंतीवर वाघ आराम करताना दिसून येतो, तर भिंतीवर राजेशाही थाटात चालतानाही दिसून येत आहे. वाघाला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याचंही व्हिडिओत दिसून येते. दरम्यान, वाघ भिंतीवर आराम करत असल्याचे पाहून तत्काळ वनविभागाने चारी बाजुंनी जाळी बांधली आहे.
पिलीभीत जिल्ह्याच्या कलीनगर तालुक्यातील ही घटना असून अटकोना गावात मध्यरात्री २ वाजता वाघाने शिरकाव केला. स्थानिकांनी वाघाला पाहिल्यानंतर तत्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर, वन विभागानेही घटनास्थळी धाव घेत चारही बाजुंनी जाळी बांधून वाघाला बंदिस्त केलं आहे. येथील एका गुरुद्वाराच्या भिंतीवर वाघ बसल्याचे स्थानिकांनी पाहताच, वाघाला पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली. विशेष म्हणजे सकाळपर्यंत वाघ त्याच भींतीवर दबा धरुन बसला होता, तेथेच टेहाळणी करत होता. त्यामुळे, सकाळी वाघाला पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते.
दरम्यान, वन विभागाचे पथक वाघाला पकडून अभयारण्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, वाघ लोकवस्तीत असल्याने आणि लोकांची मोठी गर्दी असल्याने अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागत आहे. मात्र, पिलीभीत जिल्ह्यात वाघ लोकवस्तीत येण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे, स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.