ऑनलाइन लोकमत -
जयपूर, दि. 15 - वाघाने शिकार केली असं कोणी सांगितलं तर हरिणीची किंवा इतर कुठल्या तरी प्राण्याची केली असेल असाच विचार प्रत्येकजण करतो. मात्र वाघाने बिबट्याची शिकार केल्याचं कधी तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं नसेल. सारिस्का व्याघ्रप्रकल्पात घडलेल्या दुर्मिळ घटनेत वाघिणीने बिबट्याची शिकार केली आहे. याचा व्हिडिओदेखील सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. वाघिणीने बिबट्याची शिकार करण्याची ही दुर्मिळ घटना असून कदाचित पहिलीच असल्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळी सफारीवर निघालेल्या पर्यटकांना आज आपल्याला असा काही अनुभव मिळेल याची कल्पनाही नव्हती. 'सकाळी आम्ही सफारीवर निघालो. त्यावेळी वाघ दिसावा म्हणून इकडे तिकडे पाहत होतो, तेवढ्यात गाडीच्या मागून आम्हाला वाघाची डरकाळी ऐकू आली. आम्ही पाहिलं तेव्हा वाघिण बिबट्याला पकडण्यासाठी झाडावर झेप घेत होती. तिने बिबट्याला झाडावरुन खाली खेचलं आणि त्यानंतर 10 फुटावरून त्याच्यावर उडी मारुन शिकार केल्याचं', हा सगळा थरार अनुभवणारे अभिमन्यू सिंग राजवी यांनी सांगितलं आहे.
'वाघिणीने बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याला घेऊन गेली. बिबट्या 1 ते 2 वर्षाचा असावा', अशी माहिती वन अधिकारी मनोज परसहर यांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा ते स्वत: त्या गाडीत होते.
'आपली स्पर्धा कमी करण्यासाठी तसंच आपल्या बछड्यांना मांसभक्षक प्राण्यांकडून धोका होऊ नये यासाठी वाघ असे हल्ले करतो', असं सारिस्का व्याघ्रप्रकल्पाचे फिल्ड डायरेक्टर आर एस शेखावत यांनी सांगितलं आहे.