माधोपूरः राजस्थानमधलं रणथंबोर हे अभायरण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी इथे टायगर सफारीही सुरू करण्यात आली आहे. त्याच दरम्यान थरकाप उडवणारी घटना घडली आहे. टायगर सफारीसाठी रस्त्यानं जात असलेल्या गाडीचा चक्क वाघानं पाठलाग केला आहे. चालकानं वेगानं गाडी पळवल्यानंतर वाघानंही झाडी-झुडुपांतून धावत जाऊन त्या गाडीला गाठलं, त्यानंतर गाडीचालकानं गाडी मागच्या दिशेनं वळवल्यानंतरही त्या वाघानं पाठलाग करत रस्त्यावरच गाडी अडवली, त्यामुळे गाडीमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांची भीतीनं गाळण उडाली. वाघ पाठलाग करत असतानाचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, तो एएनआय या वृत्तसंस्थेनंही दिला आहे.
खरं तर राजस्थानमधल्या रणथंबोर अभयारण्यात जास्त करून वाघ पाहायला मिळतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हे वाघ जंगलाऐवजी गाड्यांसाठी असलेल्या रस्त्याचा वापर करतात. कारण जंगलातल्या रस्त्यातून जाताना वाघांच्याही पायाला खडे टोचतात, त्याऐवजी वाहनांसाठी असणारा रस्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर असतो. कारण त्या रस्त्यावरची मातीसुद्धा मऊ असते. ती वाघांच्या चालण्यासाठी योग्य असते. रणथंबोर हे अभयारण्य वाघांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.