उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या ठिकाणी चक्क घर पाडताना एक खजिना सापडला आणि चक्क चांदीच्या नाण्यांचा पाऊस पडू लागल्याचा प्रकार घडला आहे. परिसरातील एक जुनं घर बुलडोझरने पाडण्यात येत होते. मात्र भिंत कोसळू लागली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात चांदीच्या नाणी खाली पडली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी ही नाणी लुटण्याचाही प्रयत्न केला, मोठी गर्दी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, घर अत्यंत जुनं झालं असून मोडकळीस आलं होतं. पावसाळ्यात घर पडून दुर्घटना होऊ नये या भीतीने पालिकेने ते पाडण्यास सुरुवात केली होती. याआधी प्रशासनाने मालकाला याबाबत नोटीस देखील दिली होती. पण त्यांनी घर पाडलं नाही. त्यानंतर अधिकारी जे पी यादव हे पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह घर तोडण्यास आले आणि त्यांनी तोडण्याचं काम सुरू केलं. त्याचवेळी चांदीची नाणी सापडली आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराला घेराव घातला आहे. रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच चांदीची नाणी सापडल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, या भिंतीतून 165 हून अधिक चांदीची नाणी बाहेर काढण्यात आली आहेत. प्रशासनाने ही सर्व नाणी जमा केली आहेत. यावर 1890 हे वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे.
घरामध्ये सापडलेल्या एका नाण्याचे वजन सुमारे 10 ग्रॅम असून बाजारात त्याची किंमत एक हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हे घर फार जुनं आहे. तीन दिवस सलग पाऊस होत असल्याने ते खाली कोसळणार होतं. यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. पण पालिकेने याकडे लक्ष दिल्याने दुर्घटना टळल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"