Rahul Gandhi :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या भाषणाचे पडसाद भारतात उमटत आहेत. भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली आहे. दरम्यान, परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाजपला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांच्या तोंडून एसा एक शब्द निघाला, ज्यामुळे बाजुला बसलेल्या जयराम रमेश यांनी त्यांना मध्येच रोखले आणि आपली चुक सुधारण्यास सांगितले.
राहुल म्हणाले 'दुर्दैवाने'
भाजपला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या आरोपांना मला सभागृहात उत्तर द्यायचे आहे, पण संसदेत बोलू दिले जाईल, असे वाटत नाही. दुर्दैवाने, मी एक खासदार आहे आणि मला आशा आहे की मला संसदेत बोलू दिले जाईल. मला माझे मत सभागृहात मांडायचे आहे. यावेळी राहुल यांनी 'दुर्दैवाने' हा शब्द वापरल्याने जयराम रमेश यांनी लगेच त्यांना रोखले. राहुलचे वाक्य संपताच जयराम रमेश त्यांच्या कानात जे काही बोलले ते तिथे ठेवलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाले.
भाजप तुमची चेष्टा करेल..जयराम रमेश राहुल गांधीना म्हणाले, 'तुम्ही दुर्दैवाने मी खासदार असल्याचे म्हणाला आहात, यावरुन ते तुमची खिल्ली उडवू शकतात.' जयराम रमेश यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आपले शब्द दुरुस्त करताना म्हटले की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, दुर्दैवाने मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. चार मंत्र्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांना संसदेत उत्तर देईन.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. जयराम जी ते खासदार आहेत, हेच आमच्यासाठी दुर्दैवी आहे. कोणी सांगितल्याशिवाय ते विधानही करू शकत नाहीत, याचे दुःख आहे. आश्चर्य वाटते की त्यांच्या परदेशातील विधानासाठी त्यांना कोणी प्रशिक्षण दिले असेल.