उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्यानंतर पत्नीने हायटेन्शन विजेच्या टॉवरवर चढून असा हाय व्होल्टेज ड्रामा केला आहे. यमुनानगर येथील लालापूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. बसहरा तरहार गावातील रहिवासी वंदना सिंहचं पती भोले सिंह याच्याशी कशावरून तरी भांडण झालं. या भांडणामुळे वंदना इतकी संतापली की, ती तिच्या घराजवळील शेतात असलेल्या हायटेन्शन वीज टॉवरवर चढली.
जेव्हा गावकऱ्यांनी महिलेला विजेच्या टॉवरवर पाहिले तेव्हा सर्वजण घाबरले. सर्वांनाच मोठा धक्का बसला. तिचा नवरा भोला आणि गावातील इतर लोकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती टॉवरवरून खाली येण्यास तयार नव्हती. हायटेन्शन टॉवरवर संतप्त पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा तासन्तास चालू राहिला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वीज विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
वंदनाला पोलिसांनी खाली येण्यास सांगितलं, पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. कोणाच्याही बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. हे सर्व पाहून पोलीस आणि वीज विभागाचे कर्मचाऱ्यांना काय करावं हे समजत नव्हतं. संतप्त महिलेला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी, पोलीस आणि गावकऱ्यांनी टॉवरभोवती जाळं लावलं यानंतर महिलेचा जीव वाचवण्यासाठी पोलीसच सुपरमॅन बनले.
अथक परिश्रमानंतर महिलेला दोरीच्या साहाय्याने खाली आणणाऱ्या पोलिसाच्या धाडसाचं खरोखर कौतुक करायला हवं. महिलेला टॉवरवरून खाली आणण्यात पोलीस प्रशासनाला अनेक अडचणी आल्या. तासन्तास चाललेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर, जेव्हा ती महिला टॉवरवरून खाली आली तेव्हा तिथल्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. टॉवरवरून खाली आल्यानंतरही ती महिला शांत झाली नाही. तिने तिच्या पतीवर अनेक आरोप केले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.