नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,26,62,575 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,29,942 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 3,876 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,49,992 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी झाल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशामध्ये कोरोना नियमावलीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. बदायू जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी कोरोना संकट असताना अशा घटना घडत असल्याने टीकेची झोड उठवली आहे. मुस्लिम धर्मगुरु हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच लोकांनी लॉकडाऊन असतानाही अंत्ययात्रेसाठी मोठी संख्येने गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बदायू येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत मशिदीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बदायूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बदायूमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 188 तसेच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! रेल्वेच्या 1952 जणांना कोरोनामुळे गमवावा लागला जीव; रोज 1000 कर्मचाऱ्यांना होतोय संसर्ग
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे भारतीय रेल्वेच्या 1952 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रोज जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेत तब्बल 13 लाख कर्मचारी काम करतात. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोणत्याही राज्ये किंवा प्रदेशांप्रमाणे रेल्वेची स्थिती काही वेगळी नाही. रेल्वेही कोरोनाच्या संसर्गाचा सामना करत आहे. आम्ही वाहतुकीचं काम करतो. प्रवासी आणि मालवाहतूक करतो. यामुळे रोज जवळपास 1 हजार कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होत आहे. आमच्याकडे रुग्णालये आहेत. बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. रेल्वे रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच प्लांट उभारण्यात आले आहेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतो. ते लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. गेल्या वर्षी मार्चपासून ते आतापर्यंत रेल्वेच्या 1952 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे" असं शर्मा यांनी सांगितलं.