लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बाराबंकी महामार्गावर एका महिलेनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला चपलेनं मारलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महिला आणि नेत्यानं पोलीस ठाण्यांत एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. मुलाला नोकरी देण्याचं आश्वासन देऊन पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. तर भाजप नेत्यानं हा विरोधकांचा कट असल्याचा दावा केला आहे. महिलेनं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा त्याचा आरोप आहे.
त्रिवेदीगंज भाजपचे मंडल अध्यक्ष महामार्गावरून दुचाकीनं जात असताना एका महिलेनं त्यांना पकडून चपलेनं मारहाण केली. पैसे परत देण्याची मागणी करत महिलेनं भाजप नेत्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली.
भाजप नेत्याला मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव पियारा असून ती रुकनापूरची रहिवासी आहे. मुलगा मुकेश कुमारला शाळेत नोकरी देतो असं सांगून भाजप नेत्यानं आपल्याकडून १ लाख ७५ हजार रुपये घेतले. पण मुलाला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे पैसे परत मागितले असता भाजप नेत्यानं ४५ हजार रुपयांचा युनियन बँकेचा धनादेश दिला. धनादेश घेऊन बँकेत गेल्यावर त्या खात्यात पैसेच नसल्याचं सांगण्यात आलं, असा आरोप महिलेनं केला.
भिलवल चौकात महिलेनं मारहाण करत ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप मंडल अध्यक्ष उत्तम वर्मांनी केला. 'भिलवल चौकात पियारा आणि त्रिवेदगंजमधील अनेकांनी माझी दुचाकी अडवली. मारहाण आणि आणि दलितांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली तुला अडकवू अशी धमकी त्यांनी दिली. महिलेकडे पैसे उधार घेतले होते. त्यातले १ लाख ३० हजार रोख रकमेच्या स्वरुपात परत केले. बाकीचे पैसे धनादेशाच्या माध्यमातून दिले,' असा दावा वर्मांनी केला. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.