ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 11 - भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पसार झालेला विजय माल्ल्याने रविवारी पुन्हा एकदा चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याला उपस्थिती लावली. मात्र, लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर येताच भारतीय पाठिराख्यांनी माल्ल्याची चांगलीच हुर्यो उडवली. माल्याने स्टेडियममध्ये प्रवेश करताच भारतीय प्रेक्षकांनी चोर-चोर अशा घोषणा दिल्या. एका दर्शकाने या घटनेचा व्हिडीओही शूट केला आहे.अचानक झालेला हा प्रकार विजय माल्ल्याला अनपेक्षित होता. त्यामुळे प्रेक्षकांची घोषणाबाजी ऐकून भांबावलेल्या विजय माल्ल्याने गप्प राहणे पसंत केले. प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करत माल्ल्याने थेट स्टेडियममध्ये प्रवेश केला. तर माल्ल्याच्या नंतर त्याचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्या स्टेडियममध्ये येत असताना काही दर्शकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतली.
विजय माल्ल्याने चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत - पाकिस्तान सामन्याला उपस्थिती लावली होती त्यावेळी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत - पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पाहा व्हिडीओ:
त्यावेळी, "भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे", असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं होतं. त्यानंतर आजचा सामना पाहण्यासाठी माल्ल्या स्टेडियममध्ये येताच भारतीय पाठिराख्यांनी माल्ल्याची हुर्यो उडवली.