Pm Modi Chirag Paswan Emotional Video: लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. त्याच वेळी, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात मग्न आहे. याच अनुषंगाने दिल्लीत एनडीएच्या ३८ पक्षांची बैठक सध्या चर्चेत आहे. बैठक सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
NDA घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये उभ्या असलेल्या चिराग पासवानला पीएम मोदींनी आपल्या जवळ येण्यासाठी हाक मारली आणि नंतर मोदींनी त्याची गळाभेट घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी नेत्यांमधील चिराग पासवानला बोलावून त्याच्या गालावर प्रेमाने थोपटले आणि मग मिठी मारली. त्यानंतर चिराग पासवान यांनी पीएम मोदींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. पाहा व्हिडीओ-
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी युती आता कसोटीसाठी तरायरी आहे, जी राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करू इच्छित आहे. यापूर्वी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीत ३८ पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदी स्वतः या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. एनडीएच्या बैठकीपूर्वी पीएम मोदींनी ट्विट केले होते की, "आज दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत संपूर्ण भारतातून आमचे मौल्यवान सहकारी सहभागी होणार आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे."
दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील एनडीएची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. एनडीएचा हा मोठा परिवार अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा विरोधी पक्षांची बंगळुरूमध्ये दुसरी बैठक झाली. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नावही विरोधी पक्षांच्या बैठकीत देण्यात आले. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA)' या नावाने विरोधी आघाडीने भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत 26 पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले होते.