ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 16- पत्रकारीतेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आज अनेक तरूण मंडळी या क्षेत्राकडे वळतात. ऑनफिल्ड रिपोर्टिंग करण्याकडे खरंतर विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो. रिपोर्टरचा जॉब हा सगळ्यात सोपा आहे, असा गैरसमजसुद्धा काही लोकांमध्ये असतो. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती एकदम वेगळी आहे. रिपोर्टिंग करणं ही गोष्ट अजिबात सोपी नाही. पत्रकारीता करत असताना अनेक आव्हानांना सामोर जावं लागतं. देशा-विदेशात दररोज अनेक घटना घडतात. अगदी नालेसफाईपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंतच्या सगळ्या बातम्या रिपोर्टर कव्हर करत असतो. या बातम्यांचं रिपोर्टिंग करताना अनेकदा पत्रकार आपला जीवदेखील धोक्यात घालतात. सगळी संकटं झेलत अचुक बातमी वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते, आणि ही बातमी देताना अनेकदा अशी संकटं समोर येतात की ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केरळमधील एका रिपोर्टरचा हा व्हिडिओ आहे. केरळमधील एका समुद्रकिनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी भरती आली होती. या भरतीच्या लाटांच्या तडाख्यात समुद्र किनाऱ्याजवळच्या सगळ्या झोपड्या वाहून गेल्या होत्या. तिकडच्या परिस्थितीचं रिपोर्टिग करण्यासाठी न्यूज 18 या वृत्तवाहिनीचा रिपोर्टर तिथे गेला होता. लाईव्ह रिपोर्टिंग सुरू असताना अचानक मागून समुद्राची मोठी लाट आली आणि ती लाट रिपोर्टरवर आदळली. त्यावेळी लाटेच्या तडाख्यात काही सेकंद काय झालं हे त्या रिपोर्टरला कळलंच नाही, तो पूर्ण भिजलाच पण त्याची छत्रीही मोडली. पण लगेच यातून त्याने स्वत:ला सावरलं आणि पुन्हा रिपोर्टिग करायला सुरूवात केली.
याआधी बजरंगी भाईजान या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेसाठी चाँद नवाब या पत्रकाराचं नाव वापरलं होतं. त्यानंतर चाँद नवाबचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील एका रिपोर्टरच्या रिपोर्टिंगचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. पाकिस्तान सुपर लीगच्या फायनल मॅचचं रिपोर्टिंग करायला हा रिपोर्टर गेला होता. तिकिटाच्या वाढलेल्या भावावर या रिपोर्टला बातमी द्यायची होती. फायनल मॅचची 500 रूपयांची तिकिट संपली होती आणि आठ हजारांची तिकिट बाकी होती. पण प्रेक्षकांना 500 रूपयांची तिकिट हवी होती. त्या तिकिटांसाठी लोकांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यावेळी या लोकांना कॅमेऱ्यासमोर आणण्यासाठी तो रिपोर्टरसुद्धा लोकांसोबत घोषणा द्यायला लागला आणि त्याने नाचायला सुरूवात केली. त्या रिपोर्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.