नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या आपल्या खास अंदाजामुळे आणि लोकप्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांचा असाच हटके अंदाज हा सर्वांना पाहायला मिळाला आहे. दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान रस्त्याच्या कडेला स्टॉल लावणाऱ्या काही दुकानदारांसोबत चर्चा केली. हे करत असतानाच ममता बॅनर्जींनी चक्क पाणीपुरी बनवून लहान मुलांना आणि तेथील पर्यटकांना खायला दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
ममता बॅनर्जी यांचा स्टॉलवर पाणीपुरी बनवतानाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी पाणीपुऱीच्या पुऱ्यांमध्ये उकडलेला बटाटा भरुन नंतर त्या चिंचेच्या पाण्यात बुडवून लोकांना देताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये पाणीपुरीला पुचका असं म्हटलं जातं. एका महिलेच्या पाणीपुरी स्टॉलला ममता बॅनर्जींनी भेट दिली. दार्जिलिंगमधील हाट येथील दौऱ्यावर असतानाच हा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे.
"आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दार्जिलिंगमधील हाट येथे एसएचजीच्या (सेल्फ हेल्प ग्रुप) माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या एका फूड स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी कष्टकरी महिलांचं कौतुक करण्याबरोबरच पश्चिम बंगालमधील लोकप्रिय पुचकाही तयार करुन तेथील मुलांना खाऊ घातला" असं तृणमूल काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
नव्याने निवडून आलेल्या गोरखालँड टेरिटोरिअल एडमिनिस्ट्रेशनच्या सदस्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी दार्जिलिंगला आल्या होत्या. मागच्या वेळेस त्यांनी अशाच प्रकारे मोमोज हा येथील स्थानिक लोकप्रिय पदार्थ एका फूड स्टॉलवर तयार केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.