नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानावरुन गांधी परिवारावर हल्लाबोल केला. दिल्लीतील सभेत मोदींनी पुन्हा एकदा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे नाव घेऊन काँग्रेसवर टीका केली. राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेच्या अनावरणावेळी सासरच्यांचे लाड पुरवले, असा घणाघाती आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधीच्या सेवेसाठी नौदलाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप मोदींनी या सभेत केला.
देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती. मात्र, पिकनिकसाठी जाणाऱ्या गांधी परिवाराच्या स्वागतासाठी ती युद्धनौका देण्यात आली. त्यावेळी, आयएनएस विराट 10 दिवस गांधी परिवार आणि नातेवाईकांना घेऊन पिकनिकसाठी पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या सासरवाडीचेही लोक हजर होते. विदेशी नागरिकांना भारताच्या युद्धनौकेवरुन फिरवणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळणं असंच नाही का? असा प्रश्नही मोदींनी विचारला.
राजीव गांधींना आणि ईटलीवरुन आलेल्या त्यांच्या सासूरवाडीला ही सूट कशी देण्यात आली. गांधी कुटुंबीयांच्या या सुट्टीचा किस्सा एवढ्यावर संपत नाही. गांधी कुटुंबीय ज्या बीचवर (आयलँड) गेले होते, त्या बीचवर सरकार आणि नौसेनेतील जवानांनी त्यांची सेवा केली. सैन्याचे एक विशेष हेलिकॉप्टर दिवस-रात्र त्यांची सेवा करत होता. संपूर्ण प्रशासन या कुटुंबाचे मनोरंजन करत होता. ज्यावेळी, एक कुटुंब देशात सर्वोच्च होते, तेव्हा देशाची सुरक्षा पणाला लावली जाते, त्यावेळी देशातील नागरिकांची चिंताही वाटत नसल्याचं मोदींनी म्हटले.