ऑनलाइन लोकमत
खडगपूर, दि. 21 - मशिदीवरील भोंग्यांवरून होणा-या अजानबाबत गायक सोनू निगमने ट्विट केल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप संपलेला नाही. अनेकांनी सोनू निगमचं म्हणणं अगदी योग्य असल्याचं सांगितलं आहे, तर अनेकजण त्याला विरोध दर्शवत आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजान सुरु होताच आपलं भाषण थांबवल्याचं दिसत आहे. 27 मार्च 2016 चा हा व्हिडीओ आहे.
पश्चिम बंगालमधील खडकपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचार करत असताना रॅलीला संबोधित करत होते. यावेळी जवळच्याच मस्जिदमध्ये अजान सुरु होते. अजान ऐकताच मोदी आपलं भाषण थांबवतात. जमलेल्या लोकांना पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकण्याची आतुरता असते, मात्र मोदी त्यांना हाताने शांत राहण्यास सांगतात. अजान संपल्यानंतर भाषण सुरु करण्याआधी मोदी "माफ करा, अजान चालू होती. आपल्यामुळे कोणाच्या पूजा, प्रार्थनेत अडथळा नाही आला पाहिजे, त्यामुळेच मी थांबलो होतो", असं सांगतात. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
दरम्यान अशाच प्रकारे अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा अजानबद्दल बोलत आहे. गंगाजल चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी शेअर करत प्रियांका चोप्रा सांगत आहे की, "संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर छतावर बसून मी अजान ऐकत असे. मला त्यामुळे खूप शांती मिळत असे". प्रियांकाने सांगितल्यानुसार अजान तिच्या कानामध्ये संगीताप्रमाणे वाजायचं.
सोनू निगमने १७ एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदविणारे ट्विट केले होते. यानंतर पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर दिले. कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहनही केले.
बुधवारी सोनू निगमने पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो मुस्लीमविरोधी कसा असू शकतो, असा सवाल त्याने केला.
प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या भावनांचा व ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. अजानला नव्हे, तर मशिदीवर कर्कश्श आवाजात वाजणाऱ्या लाउडस्पीकरला माझा विरोध आहे, पण याचा चुकीचा अर्थ लावला. लोक धार्मिक उत्सवाच्या नावाखाली रस्त्यावर उतरतात. मिरवणुकीत गाणे मोठ्या आवाजात वाजवितात, मद्य सेवन करून जनतेला त्रास देतात, असेही सोनू म्हणाला.
मुस्लिम मित्राकडून कापले केस -
सोनू निगमने हेअर स्टायलिस्ट अलीमला भर पत्रकार परिषदेत बोलावून घेतलं आणि केस कापून टक्कल केलं. आलिम हा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. "सोनू निगमने कोणत्याही विशिष्ट धर्माबत विधान केले नाही. त्याने लाऊडस्पिकरचा मुद्दा उठवला होता", असे म्हणत हेअर स्टायलिस्ट आलिमने सोनू निगमच्या विधानांचं समर्थन केलं आहे.
नेमके काय होते ट्विट -
‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता. "मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही", असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं.
अजान म्हणजे काय?
नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.