ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका लहानग्या मुलीसाठी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. आपल्या गाड्यांच्या ताफ्यांसह पंतप्रधान एका कार्यक्रमासाठी जात होते. तेव्हा अचानक रस्त्यात एक चिमुकली पंतप्रधानांच्या दिशेने येण्याचा प्रय़त्न करत होती. सुरक्षा रक्षकांनी तिला तात्काळ अडवलं. सुरक्षा रक्षकांनी चिमुरडीला मागे जाण्याचा इशारा केला. तेवढ्यात पंतप्रधान मोदींचे लक्ष चिमुरडीकडे गेले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकांना इशारा करत चिमुरडीला आणण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी लगेच चिमुरडीला मोदींकडे घेऊन गेले. आणि मोदींनी तिच्यासोबत काही वेळ गप्पा मारल्या.
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या सुरतमध्ये किरण मल्टी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या उद्घाटनासाठी जात होते. तेव्हा नॅन्सी गोंदालिया ही 4 वर्षाची चिमुकली आपल्या कुटुंबियांसह मोदींच्या स्वागतासाठी रस्त्यात उभी होती. नॅन्सीचे वडिल सूरतमध्ये हिेरे कामगार आहेत. मोदींसोबत गप्पा मारल्यानंतर नॅन्सी आनंदात आपल्या कुटुंबियांकडे निघून गेली आणि पंतप्रधानांचा ताफा पुढे मार्गी लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नऊ महिन्यातील हा आठवा गुजरात दौरा आहे. नोव्हेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये भाजपा सलग पाचव्यांदा सत्तेसाठी प्रयत्न करणार आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये मिळालेली विजयाची लय कायम राखणे हा सुद्धा या दौ-यामागे उद्देश आहे. हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या सूरतमध्ये काल पंतप्रधानांनी जोरदार रोड शो केला. जवळपास 10 हजार बाईक्स या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजपाने या रोड शो मधून शक्तीप्रदर्शन केले.