इंदौर : देशभरात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मध्यप्रदेशमध्ये बऱ्याच वर्षांनंतर भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली आहे. यामुळे तेथील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे मानापमान नाट्येही रंगू लागली आहेत.
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदौरच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा झेंडा कोणी फडकवायचा यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली. मानापमान नाट्यामुळे काँग्रेस नेते देवेंद्रसिंह यादव आणि चंदू कुंजीर यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करून ही मारामारी सोडवावी लागली.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील गटबाजी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावरून पुण्यात एका गटाने काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती. यानंतर त्या आमदारांनी ते कार्यकर्ते आपले नसल्याचे सांगितले होते.