जमशेदपुर - झारखंड येथील जमशेदपुर येथे एका ठगाला महिलेने चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या इसमाने एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करत महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या महिलेने पैसे देण्याच्या बहाण्याने त्या इसमाला बोलावून चप्पलेने चोप दिला. महिलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हारयल होतोय.
ही घटना मँगो परिसरातील आहे. एका माणसाने एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करत महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. या महिलेने बनावट कॉल असल्याचे ओळखल्याने सदर इसमाला पकडण्यासाठी त्याला नियोजित ठिकाणी बोलवले. त्या दरम्यान महिलेने पोलिसांनीही माहिती दिली. जेव्हा तो इसम पैसे घेण्यासाठी ठरलेल्या परिसरात पोहचला तेव्हा त्या महिलेने त्या इसमाचं स्वागत पैशांऐवजी चप्पलेने केले. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा महिलेसोबत असलेल्या माणसाने आरोपीला रस्त्यावर उचलून आपटले. नंतर बांबू घेऊन त्याचे मागे धावला. त्या दरम्यान महिलेने हातात चप्पल घेऊन आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने कशारितीने फसवणूक करणाऱ्या आरोपीला मारहाण केल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी मध्यस्थी करत त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या गाडीत बसवले. याबाबतची तक्रार मॅंगो पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आरोपीने कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने स्वत:ला एसीबी अधिकारी असल्याचा दावा केला. त्याचबरोबर बनावट ओळखपत्रही आरोपीकडून जप्त करण्यात आलं. पोलीस या प्रकरणाचा आणखी चौकशी करत आहेत.