Karnataka HC : सध्याच्या जगात घटस्फोटांचे प्रमाण हे वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या घटस्फोटानंतर पोटगीचा प्रकार देखील येतोच. याच कारणामुळे अनेकदा भांडणे देखील होतात हे वाद कोर्टापर्यंत जातात. अशाच एका पोटगी प्रकरणाच्या सुनावणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरणपोषणाची मागणी करणाऱ्या एका पत्नीचे विचित्र प्रकरण कर्नाटकउच्च न्यायालयात पोहोचलं होतं. सुनावणीदरम्यान यामध्ये मागणी केलेल्या रक्कम ऐकल्यानंतर योग्य मागणी घेऊन या, असे न्यायमूर्तींनी सांगितले.
व्हायरल व्हिडीओमध्ये कर्नाटकउच्च न्यायालयातील एक महिला न्यायमूर्ती पत्नीने तिच्या पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागितल्याबद्दल वकिलाला प्रश्न करताना दिसत आहेत. एका महिलेने तिच्या वकीलामार्फत आपल्याला पतीकडून मासिक देखभाल खर्चासाठी ६,१६, ३०० रुपये मिळावेत अशी मागणी केली होती. त्यानंतर महिला न्यायमूर्तींनी अवास्तव पोटगीच्या मागणीसाठी वकिलाला चांगलेच फटकारले. एवढी मोठी रक्कम ऐकून न्यायाधीशही थक्क झाल्या. एकटी महिला इतका खर्च करू शकत नाही, अशी तिखट टिप्पणी त्यांनी केली. जर महिलेला ब्रँडेड गोष्टींचा शौक असेल तर तिने त्यासाठी स्वतःच कमवावे, असे महिला न्यायमूर्तींनी सांगितले.
वकिलाचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर महिला न्यायमूर्ती म्हणाल्या की, कोणती अशी महिला आहे जी महिन्याला ६ लाख १६ हजार रुपये खर्च करते? तुम्ही या नियमांचा फायदा तर घेत नाही ना? त्यानंतर पतीच्या वतीने हजर असलेल्या वकिलाने याला विरोध करत हा छळ असल्याचे सांगितले. कर्नाटक उच्च न्यायालयातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पत्नीच्या वकीलाने भरणपोषणाची मागणी करताना पतीने ६,१६,३०० रुपये दरमहा पोटगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाच्या पुढे केली. "महिलेला गुडघेदुखीसह इतरही काही आजार होते. यासाठी फिजिओथेरपीचा खर्च महिन्याला ४-५ लाख रुपये आहे. महिलेला तिच्या शूज आणि कपड्यांसाठी दरमहा १५,००० रुपये लागतात. एवढेच नाही तर घरात खाण्यासाठी दरमहा ६० हजार रुपये खर्च होतात. याशिवाय घराबाहेरील जेवण्यासाठी काही हजार रुपये लागतात जातात. अशा परिस्थितीत, तिला पतीकडून ६,१६,३०० रुपये दरमहा देखभाल भत्ता म्हणून दिले जावे," असे वकिलाने सांगितले.
वकिलाने दिलेली मागणी आणि कागदपत्रे पाहिल्यानंतर महिला न्यायमूर्तींनी याबाबत भाष्य केलं. "तुमच्या अशिलाला नियमाचा जास्त फायदा घ्यायचा आहे असे तुम्हाला वाटत नाही का?, असा सवाल महिला न्यायमूर्तींनी विचारला. तेव्हा महिलेच्या वकिलाने सांगितले की, माझ्या अशिलाला म्हणजेच घटस्फोटित महिलेला ब्रँडेड कपडे वापरण्याची आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची सवय आहे. यावर महिला न्यायमूर्तींनी वकिलाला इशारा दिला.
"जर ती सर्व काही ब्रँडेड वापरत असेल तर ती स्वतः का कमावत नाही. इतका खर्च कोण करतो? तिच्यावर इतर कोणतीही जबाबदारी नाही. मुले नाहीत. महिलेची मागणी योग्य नाही. महिलेच्या वकिलालाही योग्य ती रक्कम मागावी अन्यथा तुमची याचिका फेटाळण्यात येईल," असे महिला न्यायमूर्तींनी म्हटलं.