मुंबई - कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉडडाऊननंतर देशात वेगाने बेरोजगारी आणि गरीबी वाढत आहे. त्यात, गरजू लोकांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद सुपरहिरो म्हणून समोर आला. अभिनेता सोनू सूदने अनेक प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवले तर अनेकांना आर्थिक मदत केली आहे. विशेष म्हणजे तो दररोजच गरीबांच्या मदतीसाठी पुढे येतआहे. कालच ट्विटरवर माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या दशरथ मांझीच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याचे सोनूला समजले आणि तो त्यांच्या मदतीसाठीही धावून आला. तर, आता आंध प्रदेशमधील एका गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन देण्याचं त्यानं आश्वस्त केलं आहे.
सोनू सूदला ट्विटरवर टॅग करून एका बातमी ट्विट करण्यात आली होती. सोनूकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. ज्यात लिहिले होते की, माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध दशरथ मांझीचा परिवारही हलाखीचं जीवन जगत आहे. हे वाचून सोनूने लगेच त्यांना मदतीसाठी हात पुढे केला. तर, दोन दिवसांपूर्वी सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, वृद्ध आजीबाईंना ऑफरच देऊ केली. महिलांना स्व-संरक्षणाची ट्रेनिंग देण्याचा विचार सोनूने केलाय. आता, एका गरीब शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून सोनून त्यांच्या कुटुबीयांस चक्क ट्रॅक्टर देण्याची घोषणा केली आहे.
कृष्णमुर्थी नावाच्या एका पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. सोनूने ते ट्विट रिट्विट करत बळीराजाला मदतीचा हात पुढे केला. आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथील टमाटा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतात नांगरणी करताना, बैलांच्याजागी आपल्या दोन मुलींना जुंपल्याचं दिसत आहे. बैल विकत घेण्यासाठी या शेतकऱ्याकडे पैसै नसल्याने त्याने कुटुंबाच्या मदतीनेच नांगरणी केली. कोरोना महामारीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. तर, खरीपाची पेरणी करण्यासाठीही पैसे नाहीत. यासंदर्भातील माहिती मिळताच, सोनू सूदने या गरीब शेतकऱ्याने बैलजोडी घेऊन देण्याची घोषणा केली होती. मात्र, काही वेळातच सोनूने आपला निर्णय बदलला आणि या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन देण्याचं आश्वास दिलंय. उद्यापर्यंत या बळीराजाच्या शेतात ट्रॅक्टर पोहोचेल, असेही सोनूने म्हटले.
दरम्यान, या सत्कार्यामुळे सोनू सध्या सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला असून त्यात दररोजच नवीन कामाची भर पडत आहे. सोनूच्या या संवेदनशील आणि समाजोपयोगी कामामुळे तो गरिबांच्या गळ्यातील ताईत बनला असून चाहत्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर कमालीचा वाढला आहे.