नवी दिल्ली - सीबीआयकडून आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचरविरोधात कथित आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे. व्हिडीओकॉन समुहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरू केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या 9 लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत चंदा कोचर यांच्याही नावाचा समावेश आहे. वेणुगोपाळ धूत, दीपक कोचर आणि बँक अधिका-यांची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबर 2008 मध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी न्यू पॉवर रिन्यूएबल्स (एनआरपीएल) ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीत धूत यांच्याकडे 50 टक्के समभाग होते. तर दीपक कोचर यांच्या कंपनीकडे उर्वरित समभाग होते. पॅसिफिक कॅपिटल असे या कंपनीचे नाव असून या कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या वडिलांकडे आहे. तर चंदा कोचर यांच्या भावाची पत्नी देखील या कंपनीत सक्रीय आहेत.
जानेवारी 2009 मध्ये धूत यांनी एनआरपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीचे शेअर्स 2.5 लाख रुपयांमध्ये कोचर यांना विकले. मार्च 2010 मध्ये न्यू पॉवरला धूत यांची मालकी असलेल्या सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 64 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. यानंतर मार्च 2010च्या अखेरपर्यंत न्यू पॉवरमधील 94.99 शेअर्सचा वाटा सुप्रीम पॉवरकडे गेला.
दरम्यान, कोचर कुटुंबीय आणि धूत यांच्यातील हे सर्व व्यवहार आणि बँकेचे बुडालेले कर्ज हे आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. जर या प्रकरणात सीबीआयला गुन्हा झाल्याची शक्यता वाटल्यास, संबंधितांवर गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी करण्यात येणार आहे.