नवी दिल्ली: नुकताच मोहालीत विद्यापीठातील तरुणींचा एमएमएस शूट केल्याचा प्रकार समोर आला, ज्यामुळे देशभरात गोंधळ उडाला आहे. यातच आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया आणि ट्विटरवर चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत मोठा दावा केला आहे. 'जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेले ट्विटर, लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकण्याचे माध्यम बनले आहे. ट्विटरवर लहान मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ आहेत. 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकले जातात,' असा दावा त्यांनी केला आहे.
याप्रकरणी ट्विटर इंडियाच्या प्रमुखाला समन्स पाठवण्यात आल्याचे मालीवाल यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांना दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन उत्तर देण्यासाठी बोलावले आहे. ट्विटर फक्त अमेरिकन कायद्याचे पालन करते का, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या डीसीपींनाही समन्स बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आयोगानेही तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तातडीने एफआयआर नोंदवावा. जर आमच्या समन्सला प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही अटक वॉरंटदेखील जारी करू शकतो, दिल्ली महिला आयोगाला हे करण्याचा अधिकार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.