नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात होत असतानाच, भाजपाचे वादग्रस्त खासदार साक्षी महाराज यांनी देशाची लोकसंख्या वाढण्यास मुस्लीम समुदाय जबाबदार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याचा अहवाल मागितला आहे. तसेच मेरठमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे, तर भाजपाने मात्र, या वक्तव्यपासून फारकत घेतली आहे.तसेच भाजपाचे माजी आमदार राजकुमार गौतम यांच्यासह तीन जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला वादग्रस्त पोस्टर लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निवडणुका जाहीर होऊन आदर्श आचारसंहिता लागू होताच, साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे. साक्षी महाराज म्हणाले की, ‘भारताची लोकसंख्या हिंदुंमुळे वाढत नसून, चार बायका आणि ४0 मुले ही प्रथा पाळणाऱ्यांमुळे वाढत आहे. महिला केवळ मुले जन्माला घालण्याचे मशिन नाही. आई हिंदू असो की मुसलमान, तिचा सन्मान व्हायला हवा.’ ते म्हणाले की, ‘मी कोणत्याही समुदायाविरुद्ध बोललेलो नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आहे. मी निवडणूक आयोगाचा सामना करायला तयार आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)ही आमची भूमिका नव्हे : भाजपाभाजपाने साक्षी महाराज यांच्या वक्तव्यापासून अंतर राखले आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की, साक्षी महाराज यांच्या वक्तव्याकडे भाजपाची अधिकृत भूमिका म्हणून पाहू नये. काँग्रेसची टीका : काँग्रेस नेते के. सी. मित्तल यांनी साक्षी महाराज यांच्यावर टीकास्त्र सोडले. साक्षी महाराज यांचे वक्तव्य जातीय व धार्मिक आधारावर भेदभाव करणारे असून, हे आचारसंहिता, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.मेरठ येथे एका मंदिराचे उद्घाटन करताना साक्षी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, तीनदा तलाक पद्धती संपविण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी सरकारने समान नागरी कायद्याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी.
साक्षी महाराज यांचे बेताल वक्तव्य; आयोगाने मागितला अहवाल
By admin | Published: January 08, 2017 1:04 AM