मध्य प्रदेशमध्येभाजपा नेत्यांच्या विजयानंतर आता काही अशी विधानं समोर येत आहेत ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विदिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. भाजपा नेत्यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, ज्यामध्ये ते खासदारांसमोर म्हणत आहेत की, त्यांनी खोटं मतदान केलं आणि काँग्रेसच्या एजंट पोलिंग बुथवर येऊ दिलं नाही.
काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोग आणि न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विदिशाच्या सिरोंज विधानसभेच्या लाटेरी तहसीलच्या भाजपा खासदार लता वानखेडे गुरुवारी परिसरात आयोजित एका कार्यक्रमासाठी पोहोचल्या होत्या. याच दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
सिरोंज विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार उमाकांत शर्मा यांचे प्रतिनिधी आणि लाटेरी नगरपरिषदेच्या अध्यक्षांचे पती संजय अत्तू भंडारी लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या गोष्टी सांगत होते. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संजय भंडारी दावा करताना दिसत आहेत की त्यांनी १३ मतदान केंद्रांवर काँग्रेसच्या एकाही एजंटला पोलिंग बुथवर बसू दिलं नाही. तसेच भाजपाच्या नगरसेवकाचे पती महेश साहू यांनीही १५ मतं खोट्या पद्धतीने दिल्याचं खासदारांना सांगितलं.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने हे निष्पक्ष निवडणुकीचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले की, भाजपाचे नेतेच खोटी मतं टाकल्याचं मान्य करत आहेत. काँग्रेस हे प्रकरण निवडणूक आयोग आणि न्यायालयात नेणार असून, पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करणार आहे.
मध्य प्रदेशातील विदिशामध्ये भाजपाच्या गटांमध्ये मोठा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीत पोहोचलं. कुश जयंतीला उपस्थित राहण्यासाठी खासदार लता वानखेडे लतारी येथे पोहोचल्या होत्या. याच दरम्यान, भाजपा आमदार उमाकांत शर्मा यांच्या समर्थकांनी खासदारांना वाटेत अडवून काही मुद्द्यावरून वादावादी सुरू केली.