नवी दिल्ली : कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व बंद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आता देशभरात टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल आकारला जाणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या १४ एप्रिलपर्यंत भारतात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली करता येणार नाही, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संचारबंदी लागू असल्यानं कारणाशिवाय वाहनाने कोणालाही प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणाऱ्या वाहतुकीलाच परवानगी आहे. तसेच खासगी वाहनात चालक अधिक दोन, तर रिक्षामध्ये चालक अधिक एक इतक्याच प्रवाशांना राज्य सरकारने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना गंतव्यस्थानी पोहोचावीत म्हणून भारतात टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 8:38 AM