ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मुस्लिमांसाठी पवित्र समजल्या जाणा-या हज यात्रेदरम्यान व्हायग्रा व अन्य लैंगिक उत्तेजना वाढवणारे औषध सोबत नेऊ नये असे निर्देश हज कमिटी ऑफ इंडियाने दिले आहे. याशिवाय गुटखा, तंबाखू यासारख्या पदार्थांवरही बंदी घालण्यात आली आहे.
२२ सप्टेंबरपासून सुरु होणा-या हज यात्रेसाठी १६ ऑगस्टपासून टप्पाटप्प्यात प्रवाशांचे पथक हजच्या दिशेने रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणा-या हज कमिटी ऑफ इंडियाने नुकतेच एक परिपत्रक काढून हज यात्रेसाठी निर्देश दिले आहेत. या परिपत्रकात व्हायग्रा, लैंगिक उत्तेजना वाढवणारे तेल व कॅप्सूल, पोर्न साहित्य, अंमली पदार्थ हज यात्रेदरम्यान सोबत नेऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय सौदी अरेबियात निर्बंध असलेल्या साहित्यांची एक यादीच हज कमिटीने जाहीर केली आहे. वारंवार सुचना व प्रशिक्षण देऊनही २०१३ व २०१४ या वर्षात अनेक प्रवाशांकडे व्हायग्रा व अन्य औषध आढळली होती. हा गंभीर प्रकार असून यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे असे या परिपत्रकात म्हटले आहे. सौदी अरेबियामध्ये व्हायग्रा व अन्य लैंगिक उत्तेजना वाढवणा-या औषधांवर बंदी आहे,त्यामुळेच यंदा हे परिपत्रक काढल्याचे हज कमिटी ऑफ इंडियाचे सीईओ अताऊर रहमान यांनी सांगितले. मात्र हज कमिटीच्या या परिपत्रकावर काही मुस्लिम धर्मगुरुंनी नाराजी व्यक्त केली. ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे एम ए खालिद म्हणाले, मुस्लिम व्यक्ती असे कृत्य करण्यासाठी हज यात्रेवर जात नाही, तो अल्लाहच्या आदेशानुसार हजच्या पवित्र यात्रेवर जातो. अशा प्रकारचे परिपत्रक काढून मुस्लिम समाजाला सेक्सचे व्यसन असल्याचे दाखवले जात आहे असे त्यांनी सांगितले. काही अधिकारी संपूर्ण समाजाची प्रतिमा कशी खराब करतात हे यावरुन स्पष्ट होते असेही त्यांनी नमूद केले आहे.